लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :( Marathi News ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या १२० वर्षांच्या इतिहासात देशाबाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले असून, अशी पदवी मिळवणारे उपमुख्यमंत्री फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात मंगळवारी हा पदवीप्रदान सोहळा झाला. यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांच्या उपस्थितीत फडणवीस यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
यासाठी केला गाैरव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यांसाठी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
‘२०३५ च्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करतोय’
सन २०३५ मध्ये ७५ वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. बुद्धधम्माच्या प्रसारात असलेल्या या सर्वांत जुन्या विद्यापीठाकडून सन्मान हा भावोत्कट क्षण असल्याचे ते म्हणाले. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्रविकासासाठी २०१४ साली काम सुरू केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्रसेतू यांसह अनेक प्रकल्पांसाठी जपानने मोठी मदत केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाईल, असे ते म्हणाले.