Maharashtra Politics: “हा शिंदे गट नसून शिवसेना आहे आणि ती शिल्लक सेना”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:53 PM2022-09-19T19:53:35+5:302022-09-19T19:54:37+5:30

Maharashtra News: कोस्टल रोड हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असून, आमचे सरकार तो पूर्ण करून दाखवणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray after gram panchayat election result and assured about mumbai coastal road project | Maharashtra Politics: “हा शिंदे गट नसून शिवसेना आहे आणि ती शिल्लक सेना”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Politics: “हा शिंदे गट नसून शिवसेना आहे आणि ती शिल्लक सेना”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

googlenewsNext

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. याचीच प्रचिती राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election 2022) पाहायला मिळत असून, शिंदे गटाचे पहिल्याच प्रयत्नात चांगली मुसंडी मारली आहे. शिवसेना ५ व्या स्थानी गेल्याचे चित्र आहे. यातच हा शिंदे गट नसून ही शिवसेना आहे आणि ती तिकडे शिल्लक सेना आहे, या शब्दांत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ग्रामपंचायतींच्या निकालांनी आमच्या शिवसेना-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. तुम्ही शिंदे गट जे म्हणताय हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे, तिकडे शिल्लक सेना आहे. त्यामुळे ही जी मुख्य शिवसेना जी आमच्यासोबत आलेली आहे, जी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरीत असेलली आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. ती शिवसेना आणि भाजपची जी युती आहे, त्या आमच्या युतीला पूर्णपणे लोकांनी स्वीकारलेले आहे. 

ही भविष्याचीच नांदी आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजपा असे आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे मला असे वाटते की ही भविष्याचीच नांदी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे, ती शिवसेना आणि आम्ही एकत्रित सगळ्या निवडणुका लढणार आहोत. सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हाला दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

कोस्टल रोड मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट

कोस्टल रोड हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मूळात ही संकल्पना २५ वर्षे जुनी आहे. परंतु ही संकल्पना कधीच अस्तित्वात येत नव्हती. २०१४ मध्ये ज्यावेळी आमचे सरकार आले, त्यानंतर मी स्वत: पंतप्रधान मोदींकडे गेलो आणि तेव्हाच्या आमच्या सरकारने या कोस्टल रोडसाठी परवनगी मिळवली. कारण, आपल्याकडे कोस्टरोडसाठी रिक्लिमेशनसाठी कोणताही कायदा नव्हता. दोन वर्षे प्रयत्न करून सगळ्या परवानग्या आपण मिळवल्या आणि त्याच्यानंतर याचं काम सुरू झाले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत याला उशीर होऊ नये. हा वेळेत झाला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आमचं सरकार प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार

जेवढे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मागील दोन वर्षात बंद पडले होते किंवा मंदावले होते अगर थांबले होते त्या सगळ्या प्रकल्पांना मुख्यमंत्री शिंदे यांनी गती दिली आहे. त्या गतीचा एक भाग म्हणून आम्ही पाहणीसाठी आलो. या संदर्भातील तीन बैठका या अगोदरच मुख्यमंत्री शिंदेंकडे झालेल्या आहेत. या तिन्ही बैठकांमध्ये या प्रकल्पासमोरील सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आमचे सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

 

Web Title: dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray after gram panchayat election result and assured about mumbai coastal road project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.