“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, वीर सावरकरांनी...”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 04:41 PM2024-02-21T16:41:38+5:302024-02-21T16:42:18+5:30
Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. स्वराज्य स्थापन करून समाजाला वेगळी दिशा दिली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis News: मुंबईतील कुर्ला येथे पूनम महाजन यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. हा सौभाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिली आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक नीतिवर जगभरात अभ्यास केला जातो. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. फार कमी लोकांना ठाऊक असेल छत्रपती शिवरायांची पहिली आरती ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिली. त्यानंतर ती आरती सुरेल आवाजात लतादीदींनी गायली आहे. या मंदिरात दोनवेळा ती आरती गुंजेल तेव्हा परिसर अतिशय भारून जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आग्रा किल्ल्यात आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्रा या ठिकाणी गेलो होतो. माननीय मुख्यमंत्री होते, सुधीर मुनगंटीवार होते. आग्रा किल्ल्यात गेल्यानंतर आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिथली प्रत्येक भिंत, प्रत्येक जागा शिवरायांचे वर्णन करत होती. अखिल हिंदुस्थाच्या त्या काळातील बादशहाला छत्रपतींनी थेट सुनावले होते की मी झुकणार नाही, वाकणार नाही. तेव्हा जी अनुभूती आली तशीच अनुभूती या मंदिरात मला आली. आपण देश, देव आणि धर्मासाठी काम करत आहोत त्यामुळे आपले दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, स्वराज्याच्या विचारांचे रोपण शिवरायांच्या मनात आई जिजाऊंनी केले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांना यासाठीच युगपुरुष म्हणतो. कारण त्यांनी मानव समाजाला वेगळी दिशा दिली. प्रभू श्रीराम हे देव होते. त्यांनी मनात आणले असते तर ते एकटे रावणाचा निःपात करु शकले. पण मानवजातीत अन्यायाविरोधात लढण्याचे रोपण मानवी मनात केले. त्यांच्यात अभिमान जागवला. त्यानंतर रावणावर विजय मिळवला. त्यानंतर हजारो वर्षे रावण तयार झाला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.