त्र्यंबकेश्वर मंदिरातील मिरवणुकीचा मुद्दा तापला; विधिमंडळात दावे-प्रतिदावे, फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:41 PM2023-07-24T16:41:47+5:302023-07-24T16:43:43+5:30

Maharashtra Monsoon Session 2023: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले.

dcm devendra fadnavis informed about trimbakeshwar temple issue in vidhan parishad maharashtra monsoon session 2023 | त्र्यंबकेश्वर मंदिरातील मिरवणुकीचा मुद्दा तापला; विधिमंडळात दावे-प्रतिदावे, फडणवीस म्हणाले...

त्र्यंबकेश्वर मंदिरातील मिरवणुकीचा मुद्दा तापला; विधिमंडळात दावे-प्रतिदावे, फडणवीस म्हणाले...

googlenewsNext

Maharashtra Monsoon Session 2023: मे महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लिम बांधवांनी संदल मिरवणुकीदरम्यान प्रवेशाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे झाल्याचे दिसून आले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. 

ही पेशवे काळापासून चालत आलेली प्रथा आहे. अशी प्रथा होती का? तशी असेल, तर या बाबतीत परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कुणी केला का? नेमकी चूक कुणाची होती? जाणीवपूर्वक यात जातीभेद, धर्मवाद निर्माण करण्यासाठी कुणी प्रयत्न केले होते का? एसआयटीकडून याबाबत काय अहवाल प्राप्त झालेला आहे? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले. 

संयुक्त परंपरांच्या आड येणे हाच घटनाद्रोह आहे

घटनेने जितके धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, तितकेच श्रद्धेचेही आहे. श्रद्धेच्या स्वातंत्र्यात जाणीवपूर्वक कुणी वाद निर्माण करत असेल आणि परंपरा नाही असे सांगत असेल तर संयुक्त परंपरांच्या आड येत असेल तर हा घटनाद्रोह आहे. कुठल्याही श्रद्धा व परंपरा पाळण्यासाठी शासनाची मनाई नाही. शासन त्यात कुठेही मध्ये येणार नाही. हिंदू-मुस्लीमांनी एकमेकांना सांभाळून घेतले तर त्यापेक्षा चांगले काय असेल? पण जर कुठे परंपरेच्या नावाखाली खोडसाळपणा चालत असेल, तर आपल्याला दोन्ही बाजूच्या भावना समजून घ्याव्या लागतील, असे सदस्य कपिल पाटील यांनी म्हटले. 

महिन्याभरात SITचा अहवाल येणार

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केले आहे. त्यात सरकारी अधिकारीही आहेत. त्यांनी एखादी तक्रार दिली, तर त्याची दखल घेणे हे सरकारचे काम आहे. प्रथा-परंपरेच्या नावाखाली गोंधळ घालता येणार नाही. सगळ्यांनी एकमेकांच्या धर्माप्रती श्रद्धा ठेवावी. तरच संविधानाने दिलेल्या अधिकारांचे व्यवस्थित पालन केले असे होईल. या प्रकरणाची चौकशी सुरू असून तिथे पूर्णपणे शांतता आहे. महिन्याभरात एसआयटीच्या चौकशीचा अहवाल मागवण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

दरम्यान, अशी परंपरा आहे का? हाच वादाचा भाग आहे. काही लोक म्हणतात ती आहे, काही म्हणतात अशी कोणतीही परंपरा नाही. २०२२मध्ये ही मिरवणूक ते दरवाजातून आत घेऊन गेले. तिथे सेल्फी काढत होते, शूटिंग करत होते. याचे व्हिडीओ फूटेजही उपलब्ध आहे. इथे प्रश्न हा आहे की मंदिराच्या ट्रस्टींनी तक्रार केली आणि सांगितलं की ‘अशी कोणतीही परंपरा नाही, हा आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे’. त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. दोन्ही बाजूची बैठक झाली. त्यात तिथे जाणाऱ्या लोकांनी क्षमा मागितली आहे. त्यामुळे आता तिथे शांतता आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


 

Web Title: dcm devendra fadnavis informed about trimbakeshwar temple issue in vidhan parishad maharashtra monsoon session 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.