Join us

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:53 PM

आमचे सरकार यायच्या आधीच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच हा प्रकल्प महाराष्ट्राला का मिळाला नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात बोलताना, राज्यात प्रस्तावित असलेला रिफायनरीचा प्रकल्प आणि वाढवण बंदराचा प्रकल्प आकाराला आला असता तर एव्हाना महाराष्ट्र औद्योगिक विकासात इतर राज्यांपेक्षा १० वर्षे पुढे जाऊन पोहोचला असता. आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प आणणारच आहोत. त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यात गुजरातपेक्षा पिछाडीवर असला तरी येत्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली

वेदांता आणि फॉक्सकॉनचा कल हा गुजरातकडे दिसतोय, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. अनिल अग्रवाल यांच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. लगेचच मी त्यांना फोन लावला. तुम्ही हा प्रकल्प गुजरातला का नेत आहात, याबाबत चर्चा केली. गुजरात जे जे देत आहे, तेच आम्हीही देऊ. किंबहुना त्यापेक्षा अधिक द्यायला तयार आहोत, अशी चर्चाही झाली. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांना पत्र दिले. मी स्वतः अनिल अग्रवाल यांच्या घरी गेलो. मात्र, गुजरातमध्ये जाण्यासंदर्भात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहोत. मात्र, आमचा कल महाराष्ट्राकडेही आहे. निश्चितच आगामी काळात आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू, असे आश्वासन त्यांनी मला त्यावेळी दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीवर हल्लाबोल

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला न्यायचा हे त्यांचे आधीच ठरले होते. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच त्यांचा निर्णय झाला होता. आम्ही आल्यानंतर हा प्रकल्प आपल्या राज्यातून जाऊ नये, यासाठी निकराची शर्थ केली. ज्यांनी काहीच केले नाही, ते आता आमच्याविरोधात बोलत आहेत आणि आमच्याकडे बोटे दाखवत आहेत. आम्हाला शहाणपणा शिकवतायत. तुमचे कर्तृत्व तुम्ही सांगा. तुम्ही काहीच केले नाही. तुमच्या काळात महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे पडले असेल. मात्र, पुढच्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेले नाही, तर बघाच, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलदेवेंद्र फडणवीस