‘वर्षा’वर बैठकांचे सत्र! CM शिंदे-फडणवीस यांच्यात मध्यरात्री चर्चा, जागांचा तिढा सुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:23 AM2024-03-30T09:23:34+5:302024-03-30T09:24:01+5:30
Mahayuti Seat Allocation News: महायुतीत काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री अडीच तास खलबते झाल्याचे सांगितले जात आहे.
Mahayuti Seat Allocation News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे तीन जागांवरून अडलेलेच असून तिढा कायम आहे. यातच महायुतीतही जागावाटपावरून खलबते सुरू आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप अनेक जागांवरून वाटाघाडी सुरू आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री खलबते सुरू होती. त्यामुळे जागांचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी भेट घेतली. भेटी-गाठी, चर्चा यांचा ओघ दिवसभर कायम होता, असे सांगितले जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही उपस्थित असल्याचे वृत्त आहे.
काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम
महायुतीत अद्याप काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. या जागांवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या जागेवर शिंदे गट आग्रही असून, ही जागा शिवसेनेला मिळाल्यास मोठ्या ताकदीने जिंकू, असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. या ठिकाणी उदय सामंत यांच्या भावाला उमेदवारी मिळू शकते, असे कयास आहे. तर दुसरीकडे, पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्ष आग्रही असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, हेमंत गोडसे, सुहास कांदे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञातस्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ताटकळत बसावे लागले. उदय सामंत, किरण सामंत, सुहास कांदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली.