Maharashtra Karnataka Border Dispute: “मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते, पण...”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:43 PM2022-12-06T21:43:13+5:302022-12-06T21:44:07+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: आपल्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील लोकांशी चर्चा केल्यानंतर कर्नाटकाकडून या प्रतिक्रिया सुरु झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळे वळण देण्याचे काम केले जात आहे. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपले नाही, तर मला बेळगावात जावे लागेल. तेथील स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते
पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले. यावर बोलताना, मुळात या सगळ्या गोष्टीची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलावले होते. शरद पवार यांनाही बोलावण्यात आले होते. कदाचित तब्येतीच्या कारणामुळे ते तेव्हा येऊ शकले नसतील. परंतु, सीमाप्रश्नी नेहमीच शरद पवार यांनी चांगले लक्ष घातले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच विविध पक्षाच्या लोकांसह सीमाभागातील लोकांना बोलावून पुढे काय करायचे याची चर्चा झाली. या चर्चेनंतरच यासंदर्भातील प्रतिक्रिया देणे कर्नाटकने सुरू केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय, शरद पवार यांना ४८ तासांत सीमाभागात जायची वेळ येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्र न्यायप्रियतेसाठी ओळखले जाते. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. जे कुणी वाहने रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"