Join us

“एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 1:55 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Devedra Fadnavis News: मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गटाने तयारीला सुरुवात केली आहे. कधीही निवडणुका लागू शकतात, असे म्हटले जात आहे. आताच्या घडीला राज्यातील अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे सातत्याने मुंबईच्या विकासकामांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आहेत. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुंबईकर म्हणून टोल भरतोय. परंतु पश्चिम द्रुतगती, पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडलेत. हे दोन हायवे बीएमसीकडे दुरुस्तीसाठी दिलेत. मग हे टोल का भरायचे. मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? हे सरकार पडल्यानंतर आमचे नवीन सरकार येणार आहे. ज्यादिवशी सरकार येईल तेव्हा आम्ही टोल बंद करू, असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले होते. तसेच यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. 

...तर मुंबई अधिक चांगली झाली असती

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या चांगली कामे सुरु आहेत. त्यामुळे काहीच्या पोटात दुखत आहे. पोटात दुखत असल्याने काही लोक रोज पत्र लिहित आहेत. काँक्रिट रस्त्याची कामे चालली आहेत. अर्थात चांगली काम चालतात, तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखते, तेव्हा ते रोज एक पत्र लिहितात. अशाच प्रकारच एक पत्र त्यांनी स्वत:ला २५ वर्ष लिहिले असते, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्र प्रपंचाचा समाचार घेतला. 

दरम्यान, मी चहल यांना सांगीन, की तुम्ही चांगले काम करत आहात. एक बरे आहे, निंदकाच घर असावे शेजारी, आपल्या शेजारी ते बसले आहेत. रोज ते तुमच्यावर बोट उचलतील, तुम्ही संधी देऊ नका. पारदर्शी, प्रामाणिकपणे काम करा. मुंबई बदलतेय, अशाच पद्धतीच काम केलत, तर खड्डेमुक्त मुंबईच मुख्यमंत्र्यांच स्वप्न तुम्ही पूर्ण करु शकता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरेआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे