Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:04 PM2022-12-06T21:04:05+5:302022-12-06T21:04:59+5:30

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

dcm devendra fadnavis said i will inform about maharashtra karnataka border dispute to union home minister amit shah | Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीमाप्रश्नासंदर्भातील सगळी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत (Amit Shah) पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे. 

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

कर्नाटकने हे सर्व थांबवावे, क्रियेला प्रतिक्रिया नको

कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्र न्यायप्रियतेसाठी ओळखले जाते. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. जे कुणी वाहने रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत होत असलेल्या आक्षेपार्ह विधानांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. कुणाच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याने शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निमित्त करुन हा मोर्चा काढण्यात येत आहे. यांची नाराजी वेगळी असल्याने ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यपालांनी स्वत: छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, असे सांगितले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्याच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच दोन्ही राज्यातील जनता सुखाने, समाधानाने राहिली पाहिजे. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, असे बोम्मईंना सांगण्यात आले. एवढेच नाही तर दोन्ही मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात भेटणार असल्याचे सामंत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dcm devendra fadnavis said i will inform about maharashtra karnataka border dispute to union home minister amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.