मंत्रालयासमोर बिल्डरकडे डीसीआर बदलला; आशिष शेलार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:10 AM2020-03-14T02:10:14+5:302020-03-14T02:10:39+5:30
आता आलेल्या आघाडी सरकारने गेल्या १०० दिवसांत त्यामध्ये अनेक बिल्डरधार्जिणे बदल केले असून त्याची नस्ती सही झाली आहे, असे कळते.
मुंबई : मुंबई सोडून सर्व शहरांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (युडीसीआर) तयार करण्यात आली पण नंतर मंत्रालयासमोर एका बिल्डरच्या गेस्टहाऊसमध्ये बसून तीत बदल करण्यात आले, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत नगरविकास विभागावर बोलताना शेलार यांनी, मंत्रालयासमोरच्या या बिल्डरच्या गेस्ट हाऊसमध्ये याबाबतचे निर्णय घेण्यासाठी सचिव व अधिकाऱ्यांना बोलावले जाते. ते गेस्ट हाऊस कोणाचे आहे? एबी की एबीसीचे आहे ? की पुण्याचे आहे?, असा सवालही केला.
१३ मार्च २०२० रोजी राज्यातील सर्व शहरांचा विकास एकाच पद्धतीने सुनियोजित व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई सोडून सर्व शहरांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (युडीसीआर) तयार करण्यात आली. यामध्ये जनहित विचार करून संबंधित यंत्रणा बैठक घेऊन हा मसुदा तयार करण्यात आला होता. त्याला विविध पातळ्यांवर मंजुरी देण्यात आल्या. त्याची अधिसूचना निघण्यापूर्वी दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बदलले, असे ते म्हणाले.
आता आलेल्या आघाडी सरकारने गेल्या १०० दिवसांत त्यामध्ये अनेक बिल्डरधार्जिणे बदल केले असून त्याची नस्ती सही झाली आहे, असे कळते. यु-डीसीआर मध्ये आघाडी सरकारने अशा प्रकारचे बदल केल्यामुळे शहरातील जमिनीवरील मनोरंजन मैदाने या सरकारने खाल्ली आहेत. एफएसआयची खैरात मागच्या दाराने केली आहे. अग्नी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले आहेत. निवासी भागातील शांतता धोक्यात आणली आहे, असा आरोप त्यांनी केला.
खोटं बोल, रेटून बोल - शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आशीष शेलार यांचे आरोप फेटाळून लावले. हे आरोप निराधार असून खोटं बोल पण रेटून बोल, असा हा प्रकार आहे असे सांगून ‘तुम्ही मला पुरावे द्या. आतापर्यंत झाली नसेल अशी कठोर कारवाई मी केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिंदे यांनी शेलारांना दिले.