-श्रीकांत जाधव
मुंबई : व्यसनाधीनतेने खूपच भयानक रूप धारण केले आहे. प्रामुख्याने युवक- युवतींचे नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण खूपच आहे. तेव्हा नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांच्या नावाने व्यसनाची धुंदी नसावी. तर वर्षाची सुरूवात आनंदाने, उत्साहाने आणि नवं संकल्प ठेवून करण्यात यावी, असे कळकळीचे आवाहन राज्य नशाबंदी मंडळाने केले आहे. व्यसनमुक्तीचा संदेश देत त्यांनी जागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत.
३१ डिसेंबर रोजी थर्टीफस्ट पार्ट्यांच्या नावाखाली अनेक तरुण स्वतःच्या सुंदर जीवनाला कसा काळीमा फसतात, वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या आयुष्यात अखेरचा ठरतो, याबाबत नशाबंदी मंडळाने शनिवार कँपिटल सिनेमा समोर, सिएसएमटी स्टेशन बाहेर जागृती कार्यक्रम सादर केला. मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल मडामे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
पृथ्वीवर कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करत नाहीत. र्निबुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासुन दुर ठेवतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असुनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांने आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे. त्यामुळे बलुन रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसनकरीत नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा उपस्थितांना संदेश दिला.