कोविड प्रतिबंधक नियम मोडल्याने मालाडचे डी मार्ट सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:29+5:302021-07-25T04:06:29+5:30
मुंबई - कोविड प्रतिबंधक नियमानुसार ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत विक्री सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दीडशे ग्राहकांना ...
मुंबई - कोविड प्रतिबंधक नियमानुसार ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत विक्री सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दीडशे ग्राहकांना प्रवेश देण्याऐवजी मालाड येथील डी मार्टमध्ये शनिवारी पालिकेच्या तपासणीत सहाशे ग्राहक आढळून आले, तसेच सोशल डिस्टन्सचे तीनतेरा, मास्कचा वापर केला जात नसल्याने दिसून आल्याने हे डी मार्ट पी/उत्तर विभागाने सील केले.
मुंबईत दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी पालिकेमार्फत विभागस्तरावर पाहणी केली जाते. त्यानुसार मालाड पश्चिम लिंक रोडवरील डी मार्टवर पालिका अधिकाऱ्यांनी छापा टाकून पाहणी केली असता नियम धाब्यावर बसवल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होती, तसेच कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे वापरले नव्हते. त्यामुळे डी मार्ट सील करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
तीन दिवसांत मागविले स्पष्टीकरण
एकाच वेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचा भंग केला आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने हे डी मार्ट व्यावसायिक आस्थापनाच्या पुढील आदेशापर्यंत पालिकेने बंद केले आहे, तसेच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंगबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.