डिव्हिलियर्सच्या यष्टिरक्षणामुळे आरसीबी संतुलित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:08 AM2020-09-30T02:08:48+5:302020-09-30T02:09:17+5:30
वॉशिंग्टन सुंदर । संघाची गरज ओळखून बजावतो भूमिका
दुबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सुपरस्टार अब्राहम डिव्हिलियर्स याची कामगिरी प्रभावित करणारी आहे. तो करू शकणार नाही, अशी एकही गोष्ट नाही. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह तो यष्टिरक्षणातही पारंगत आहे. विविध भूमिका बजावण्यात त्याला आनंद येतो. द. आफ्रिकेच्या या आक्रमक खेळाडूच्या क्षमतेमुळे संघात संतुलन आल्याचे मत फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याने व्यक्त केले.
डिव्हिलियर्सने सोमवारी मुंबईविरुद्ध चांगली फलंदाजी केलीच शिवाय खराब फॉर्ममध्ये असलेल्या जोश फिलिपऐवजी यष्टिरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली. २४ चेंडूत अर्धशतक फटकावणारा डिव्हिलियर्स सामन्याचा मानकरी ठरला. आंतरराष्टÑीय क्रिकेटमधील निवृत्त झालेल्या ३६ वर्षांच्या डिव्हिलियर्सबाबत सुंदर म्हणाला,‘ क्रिकेटमध्ये असे काय आहे जे डिव्हिलियर्स करू शकणार नाही. मी तर आश्चर्यचकित झालो. आरसीबीसाठी हा खेळाडू वर्षानुवर्षे स्वखुशीने हे काम करतो आहे. यामुळे संघात संतुलन साधले जाते. त्याच्या यष्टिरक्षणामुळे गोलंदाजांना मदत मिळते शिवाय संघालादेखील लाभ होतो.’
सोमवारच्या सामन्याबाबत सुंदर म्हणाला, ‘वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने सुपरओव्हरमध्ये केवळ सात धावा देत क्षमतेचा परिचय दिला. मागच्या काही वर्षांपासून सैनीच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत आहे. तो प्रत्येक सामन्यातून नवे काहीतरी शिकतो. हार्दिक आणि पोलार्डसारखे हिटर खेळपट्टीवर असताना सात धावा देणे शानदार ठरले. त्यातून त्याच्यातील समर्पितवृत्ती आणि विजयाची भूक ओळखता येते. विजयाचे श्रेय त्याला दिले पाहिजे.’
या सामन्यात ४०० हून अधिक धावा निघाल्या. मी मात्र चार षटकात केवळ १२ धावा देत एक गडी बाद केला. स्वत:च्या कामगिरीवर समाधानी आहे. मी रणनीतीवर भर दिला. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना आनंद झाला. दोन दिग्गज फलंदाज खेळत असताना सर्कलबाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक असतील तर थरार अनुभवता येतो. कर्णधाराने माझ्यावर विश्वास दाखवला, याचा सर्वाधिक आनंद आहे.’
-वॉशिंग्टन सुंदर