सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; अंत्यसंस्कारही झाल्यानं नातेवाईक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:26 PM2020-09-13T23:26:37+5:302020-09-14T00:32:55+5:30
रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा प्रचंड गोंधळ; किडनी काढल्याचा आरोप
मुंबई: महापालिकेच्या सायन रूग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. रस्ते अपघातात जखमी होऊन शनिवारी रात्री मृत पावलेल्या अंकुश सुरवाडे या २७ वर्षीय तरूणाचा मृतदेह रुग्णालयाने भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. तसंच अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला असून रूग्णालयाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.
व्यवसायाने डान्सर असलेला अंकुश सुरवाडे (वय २७ वर्षे) २८ ऑगस्टला वडाळ्यातील इस्टर्न फ्री वेवर अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. कुटुंबानं मृतदेह ताब्यात देण्यासाठी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मुंबई्च्या सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; अंत्यसंस्कारही झाल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त; पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/uCj15emt3d
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2020
अंकुशच्या मृतदेहावर सायन येथील स्मशानभूमीत दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह पॅकिंग करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितलं. या प्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांनी तसंच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं पोलीस दाखल झाले. अंकुशचे कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी सायन पोलीस ठाण्यात गेले असता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाले असून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
किडनी काढल्याचा कुटुंबाचा आरोप
रुग्णालयाने तरुणाची किडनी काढल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनीही किडनीचा भाग कापल्याचं दिसतं असल्याचं म्हटलं आहे. रुग्णालय प्रशासनानं मृतदेहाची अदलाबदल झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र किडनी काढल्याचा आरोप फेटाळून लावल्याची माहिती सुत्रांनी दिली.