जुहू कोळीवाडा येथील समुद्रात बुडालेल्या मुलांचे मृतदेह २० तासांनंतर हाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 01:24 PM2023-06-14T13:24:07+5:302023-06-14T13:24:35+5:30
मृतांमधील तीनही जण वाकोल्याचे रहिवासी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सोमवारी सायंकाळी बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह तब्बल २० तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले आहेत. जय रोहन ताजभारिया (१६) याचा शाेध अद्याप सुरू आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सांताक्रूझ वाकोला येथील एकाच वयोगटातील पाच मुले समुद्रात गेली होती. त्यातील चौघे बुडाले तर एकाला वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभाग, पालिका प्रशासनाकडून देण्यात आला असतानाही वाकोला येथील पाच मुले जीवरक्षक दल, पोलिस तसेच स्थानिकांची नजर चुकवून समुद्रात गेले. या पाचही जणांना स्थानिकांनी हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्याकडे मुलांनी दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणजे खवळलेल्या समुद्रात ते बुडाले, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. ही मुले समुद्रात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर तेथील कोळी बांधवांनी धर्मेश ताजभारिया (१६) याला कसेबसे समुद्राबाहेर काढले. मात्र, इतर चौघे जण समुद्रात बुडाले.
‘ती’ रील ठरली अखेरची
घटनेपूर्वी एक ग्रुप फोटो क्लिक करत मुलांनी रील बनवली. ती शेअर करताना पार्श्वसंगीतात त्यांनी ‘जिओ तो हर पल ऐसे जिओ, जैसे की आखरी पल हो’ असे देखील लिहिले. सोमवारी या ८ मुलांनी पाऊस पडत असल्याने ते क्रिकेट खेळायला जात आहेत, असे सांगितले. त्यांनी १० ते २० रुपये घेतले. पण ते जुहू चौपाटीवर जात असल्याची माहिती दिली नाही. दुपारी अडीचच्या सुमारास सर्व जण चौकाजवळ जमले. तथापि, संध्याकाळी मुले बुडाल्याचे समजले.
मृत मुलांची नावे
- मनीष योगेश ओगानिया (१६)
- शुभम योगेश ओगानिया (१६)
- धर्मेश वालजी फौजिया (१६)
मृत्यूच्या बातमीने शोककळा!
मनीष ओगानिया आणि शुभम ओगानिया हे सख्खे भाऊ होते. कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले की, “शुभम फक्त १५ वर्षांचा होता. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब असल्याने घरी मदत करण्यासाठी तो रस्त्यावर कांदे-बटाटेही विकायचा. मात्र, त्यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.
जुहू समुद्र किनारी न गेलेल्या मुलांपैकी १२ वर्षांच्या दोन मुलांनी पोलिसांना सांगितले की, “सर्व किशोरवयीन मुले २:३० च्या सुमारास भेटलो तेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी जुहू बीचवर गेलो. त्याबद्दल काहींनी नकार दिला आणि त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, जुहू कोळीवाड्यात बीएमसी मैदान आहे तिथेही क्रिकेट खेळता येईल. मात्र, ज्यांना रस आहे ते मनोरंजनासाठी समुद्राच्या पाण्यात जातील, असे ठरले. दुपारी ३:०० वाजता सर्व मुले जुहू परिसरात पोहोचली.
क्रिकेट खेळल्यानंतर सर्व किशोरांनी बीएमसीच्या मैदानातून जुहू बीचवर प्रवेश केला आणि समुद्राच्या पाण्यात गेले आणि मोठ्या लाटांनी त्या सर्वांना समुद्रात ओढले. एका स्थानिक मच्छिमाराने दोरीच्या साहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याने एकाला वाचविले. पण, इतर पाच समुद्राच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान, दोघांंनी त्यांचे मित्र समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने भीतीने घटनास्थळावरून पळ काढला आणि उर्वरित दोघे तिथे थांबले, ज्यांना मच्छिमाराने पोलिस ठाण्यात नेले.