मुंबई : कांदिवली पूर्व येथे राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ६१ वर्षीय पतीने आत्महत्या केली आहे, मात्र ५७ वर्षीय पत्नीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांना घरात एक चिठ्ठी सापडली असून, त्याआधारे समतानगर पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
प्रमोद वासुदेव चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर असे या दाम्पत्याचे नाव असून, ते कांदिवलीतील आर्य चाणक्यनगर येथील अनुभूती सोसायटीमध्ये राहत होते. चोणकर यांना मूलबाळ नव्हते. ते दोघेही एकाकी जीवन जगत होते. गेल्या दोन ते तीन दिवसात त्यांना स्थानिक रहिवाशांनी पाहिले नव्हते. हा प्रकार अनेकांना संशयास्पद वाटत असताना, गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ही माहिती समतानगर पोलिसांना दिली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दरवाजा उघडला त्यावेळी प्रमोद हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. तर, त्यांची पत्नी अर्पिता या त्यांच्या शेजारी खाटेवर पडलेल्या होत्या. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रमोद यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्यात दाम्पत्याला आर्थिक चणचण होती, असे स्पष्ट होत आहे. १४ मे रोजी ही चिठ्ठी लिहिलेली होती. दरम्यान, शवविच्छेदनात प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहेत. परंतु, त्यांच्या पत्नीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी व्हिसेरा तपासणी करण्यात येणार आहे.
आर्थिक अडचणी... मृत दाम्पत्य हे निपुत्रीक असून, आर्थिक चणचणीमुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी जीवन संपविले आहे, असे प्राथमिक तपासात प्रमोद चोणकर यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकुरावरून समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ मे रोजी ही चिठ्ठी लिहिलेली असून, त्याच दिवशी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.