मुंबई : मुंबईतील वरळी सी फेसवर एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह गोणीत आढळून आला. समुद्राच्या पाण्यातून बाहेर आलेला हा तरुणीचा मृतदेह हात-पाय तुटलेल्या अवस्थेत गोणीत होता. अंदाजे ५ ते ७ दिवसांपूर्वी तरुणीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, मृत तरुणीचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जाणाऱ्या एका तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यान एका व्यक्तीने लोकलमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय, चर्नी रोड ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका महिलेचा अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला होता. आता वरळी सी फेसवर आढळलेल्या मृतदेहामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.