Join us

जुहू सिल्व्हर बीचवर मृत डॉल्फिन आढळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 9:17 AM

जुहू सिल्व्हर बीचवर सुमारे साडेतीन फूट लांब मृत डॉल्फिन वाहून आला

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गेले दोन-तीन महिने मुंबईच्या किनाऱ्यावर मृत डॉल्फिन सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी रात्री जुहू सिल्व्हर बीचवर सुमारे साडेतीन फूट लांब मृत डॉल्फिन वाहून आला. त्याच्या तोंडाला मासे पकडण्याची जाळी अडकली होती आणि समुद्रातील प्लास्टिकमध्ये हा डॉल्फिन अडकला. त्यामुळे कदाचित समुद्रातील जाळीत व प्लास्टिकमध्ये अडकून हा डॉल्फिन मृत्युमुखी पडला असावा अशी माहिती सी गार्डीयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.

सोमवारी सकाळी अस्वच्छ झालेल्या जुहू सिल्व्हर बीचवर पाहाणी करण्यासाठी कानोजिया गेले असताना त्यांना हा मृत डॉल्फिन आढळला. या बीचची कचराकुंडी झाली असून येथे सुमारे 100 डंपर कचरा आहे. लोकमतने या संदर्भात आवाज उठवला होता. मात्र अजूनही येथील कचरा पालिकेने काढला नाही. भरतीत हा कचरा परत समुद्रात वाहून जात असून डॉल्फिन व इतर मासे त्याचे सेवन करत असल्याने डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या किनाऱ्यावर मृत डॉल्फिन सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य तज्ञ समिती गठीत करून याला आळा घालावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :मुंबई