मुंबई : केईएम रुग्णालयात नुकताच प्रिन्स या चिमुरड्याचा निष्काळजीपणामुळे जीव गेला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मंगळवारी रुग्णालयात मांजर मृत मानवी भ्रूण खाताना दिसल्याने पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर ताबडतोब तेथील स्वच्छता हाती घेण्यात आल्याचे दिसून आले. याविषयी, बायोवेस्ट वाहनातून मृत भ्रूण पडल्याचे स्पष्टीकरण केईएम प्रशासनाने दिले. तसेच याबद्दल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपास सुरू असल्याचेही सांगितले.केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक सातजवळ बायोमेडिकल वेस्ट रूम आहे. तिथे रुग्णांच्या शरीराचे कापलेले अवयव पिशवीमध्ये योग्य रीतीने पॅक करून त्यात ठेवलेले असतात. त्याच रूममध्ये दोन-तीन महिन्यांचे एक मृत भ्रूण ठेवण्यात आले होते.केईएममध्ये मांजरींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अशाच एका मांजराने हे भ्रूण पळविले आणि कपाटाखाली नेऊन पॅकिंग फाडून खायला सुरुवात केली. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करेपर्यंत भ्रूणाच्या डोक्याचा बराचसा भाग मांजरीने खाल्ला होता. डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे.या बायोमेडिकल वेस्ट रूमजवळ घाण जमा झालेली असून तेथे मोठ्या प्रमाणावर रॅबीटही पडलेले होते. त्याचप्रमाणे अंधार पसरलेला होता. बायोमेडिकल वेस्ट रूमसमोर शौचालय असून त्यातूनही दुर्गंधी पसरत असल्याने या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे.बायोमेडिकल वेस्ट रूमकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तेथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर, बायोमेडिकल वेस्टचा कचरा भरलेल्या वाहनामधून मानवी भ्रूण खाली पडले असल्याचे केईएम प्रशासनाचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.अशी घटना यापूर्वी घडलेली नाहीप्रत्येक बायोमेडिकल वेस्टच्या पिशव्यांवर ते वेस्टेज मटेरिअल कोणत्या विभागातून आणले याबद्दल माहिती लिहिण्यात येते. तसेच ते बायोवेस्टेज जमा करताना त्याचे लॉग बुक मेंटेन केले जाते. तसेच एफ दक्षिण विभागाकडून एका कंपनीची नियुक्ती वेस्टज मटेरिअलची विल्हेवाट लावण्यासाठी निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छतेचे काम नियोजित वेळेत केले जाते. बायोमेडिकल वेस्टचा कचरा भरलेल्या वाहनामधून मानवी मृत भ्रूण खाली पडल्याचा अंदाज आहे. अशी घटना यापूर्वी घडलेली नाही. तसेच याबद्दल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपास सुरू आहे.- डॉ. हेमंत देशमुख, केईएम रुग्णालय, अधिष्ठाता
बायोवेस्ट वाहनातून पडलेले मृत भ्रूण मांजरीने खाल्ले, केईएम प्रशासनाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:34 AM