मुंबई-
वरळी येथील बार्बेक्यू नेशन नावाच्या रेस्टॉरंटमधून मागवलेल्या जेवणात मेलेला उंदीर आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे जेवण खाल्ल्यामुळे ग्राहकाच्या पोटात दुखू लागलं आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ ओढावल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित रेस्टॉरंटला नोटीस धाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
राजीव शुक्ला हे पर्यटनाच्या निमित्ताने प्रयागराज येथून मुंबईत आले होते. त्यांनी ८ जानेवारी रोजी वरळीच्या बार्बेक्यू नेशन येथून ऑनलाइन ऑर्डरद्वारे दालमखनी मागवली होती. दालमखनी खाल्ल्यानंतर चव विचित्र लागली आणि पडताळून पाहिलं असतं. त्यात मेलेला उंदीर आढळून आला. त्यानंतर काही वेळाने राजीव शुक्ला यांना पोटदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर नायर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ ओढावली. अन्नातून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर रुग्णालयाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आणि एफडीएलाही कळवले आहे.
राजीव शुक्ला यांच्या तक्रारीनुसार एफडीएनंही याची गंभीर देखल घेतली आणि रेस्टॉरंटची तपासणी केली. एफडीएनं रेस्टॉरंटला सुधारणा नोटीस बजावली आहे. तसेच रेस्टॉरंटमधील अन्नाचे काही नमुनेही घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच हाती येईल असं एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.