मरेच्या लोकल फेऱ्यांना चोरांचा ‘रेड सिग्नल’!
By admin | Published: January 8, 2016 02:42 AM2016-01-08T02:42:02+5:302016-01-08T02:42:02+5:30
मध्य रेल्वेच्या रुळांजवळ असलेल्या सिग्नलचे केबल किंवा त्याच्याशी संबंधित अन्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या रुळांजवळ असलेल्या सिग्नलचे केबल किंवा त्याच्याशी संबंधित अन्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकल फेऱ्यांना ‘रेड सिग्नल’ मिळत असून, लेटमार्क लागण्याबरोबरच सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत.
याविरोधात मागील वर्षभरात आरपीएफकडून केलेल्या कारवाईत ४0 जणांना जेलची हवा खावी लागली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा पसारा हा सीएसटीपासून ते कर्जत, कसारा, खोपोली तर हार्बरचा नवी मुंबईपर्यंत आहे. या मार्गावर १२१ लोकलच्या जवळपास १,६00 फेऱ्या होतात आणि ४0 ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या यंत्रणेला सध्या तांत्रिक कारणांनी बेजार केले आहे. यात मुख्यत्वे सिग्नल यंत्रणेतील बिघाड लोकल यंत्रणा विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. मरे प्रशासनाला रुळाजवळ असणाऱ्या सिग्नलच्या केबल चोरीच्या तसेच त्याच्याशी संबंधित अन्य यंत्रणेच्या चोऱ्या होत असल्याचे निदर्शनास आले. २0१५मध्ये आरपीएफच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत सिग्नल केबल आणि त्याच्याशी संबंधित अन्य यंत्रणेच्या चोरीच्या १६९ केसेसची नोंद करण्यात आली आहे. यात २ लाख ५६ हजार ७00 रुपये दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.
सिग्नल केबल आणि संबंधित यंत्रणेच्या चोरीच्या घटना या कुर्ला, मानखुर्द, कोपरखैरणे, मुंब्रा, दादर आणि वडाळा स्थानकांदरम्यान घडत असल्याची माहिती देण्यात आली.