सीएसएमटी स्थानकात मोटरमनच्या लॉबीमध्ये सोमवारी सकाळी भयंकर दुर्गंधी पसरल्यामुळे सर्व मोटरमनला खुर्ची, टेबल घेऊन थेट स्थानकातच बसण्याची वेळ आली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या लॉबीमध्येच सर्व मोटरमन बाहेर बसलेले आढळून आल्यानं प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला. नेमकं काय घडलं याची माहिती जाणून घेतली असता रेल्वेच्या एका मोटरमननं नाव न सांगण्याच्या अटीवर घटना सांगितली.
सीएसएमटी स्थानकातील मोटरमन्ससाठीची लॉबी पूर्णपणे वातानुकूलीत आहे. पण सोमवारी सकाळी या लॉबीच्या एसीमधून प्रचंड दुर्गंधी पसरली. ती इतकी वाढली की मोटरमनला लॉबीमध्ये थांबणंही असह्य होत होतं. त्यामुळे सर्व मोटरमन्सनं लॉबी बाहेरच बसण्याचा निर्णय घेतला. यासाठी मोटरमन लॉबीमधील सर्व खुर्च्या आणि टेबल बाहेर आणले गेले.
मोटरमनच्या लॉबीमधील दुर्गंधीची तक्रार केल्यानंतर साफसफाई केली गेली. यावेळी एसीच्या डकमध्ये बरेच मेलेले उंदीर आढळून आले. त्यामुळेच दुर्गंधी पसरली होती. पण स्वच्छतेचे काम पूर्ण होईपर्यंत दुपारचे चार वाजले होते. तोवर मोटरमनना लॉबीबाहेरच बसावे लागले.
रेल्वेमंत्र्यांचा दौरा अन् पेस्ट कंट्रोलअलिकडेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यात वैष्णव यांनी सीएसएमटी स्टेशनच्या याच मोटरमन केबीनची पाहणी केली होती. रेल्वेमंत्री येणार म्हणून प्रशासनाकडून मोटरमन लॉबी आणि आजूबाजूच्या कार्यालयांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. या पेस्ट कंट्रोलमुळे बाहेर पडणारे उंदीर एसी डकमध्येच अडकून मेले. यामुळेच सोमवारी मोटरमनच्या लॉबीमध्ये दुर्गंधी पसरली होती.