आयडॉलच्या प्रवेशास शुक्रवारपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:06 AM2019-09-17T06:06:40+5:302019-09-17T06:06:46+5:30
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या सर्व वर्गाच्या प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या सर्व वर्गाच्या प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ २० सप्टेंबर, २०१९ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. आयडॉलमध्ये ६५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, त्यातील ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहेत.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, शुल्क न भरलेले विद्यार्थी हे इतर विद्यापीठाचे व शिष्यवृत्तीधारक असून, त्याच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यात ज्यांची तपासणी झाली, ते विद्यार्थी अभ्यासक्रमाचे शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित करतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
युजीसीने जुलै सत्रासाठी प्रवेशाची तारीख ३१ आॅगस्टपर्यंत करण्यात आली होती, परंतु या वर्षी देशातील अनेक राज्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. परिणामी, अनेक विद्यापीठांनी युजीसीला प्रवेशाची तारीख वाढविण्याची विनंती केली होती. याला अनुसरून यूजीसीने
११ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्रवेशाची तारीख वाढविण्यात आली आहे.
यानुसार, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या प्रवेशाची तारीख वाढविली आहे.
>प्रवेश होत असलेले अभ्यासक्रम
बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी, एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमए व एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमामध्ये हे प्रवेश होत आहेत. हे प्रवेश आॅनलाइन असून, प्रवेश शुल्क हेदेखील आॅनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. हे प्रवेश आयडॉलच्या संकेतस्थळावरून करावयाचे आहेत.
आतापर्यंत ६२ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश घेतला आहे. प्रवेश घेतल्यापैकी ४१,९२५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत प्रवेश घेतला आहे. यातील एमकॉम या एका अभ्यासक्रमामध्ये २३,९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर त्या खालोखाल कला या शाखेतील बीए व एमए या अभ्यासक्रमामध्ये १८,२६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत १,४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
>विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सातही जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे यूजीसीने प्रवेशाची मुदत वाढविल्यामुळे अतिवृष्टीमुळे व इतर काही कारणामुळे ज्यांचे प्रवेश राहिले, ते या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतील.
- डॉ. सुहास पेडणेकर,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.