अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी संस्थांना २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 06:06 AM2019-08-13T06:06:23+5:302019-08-13T06:07:14+5:30
अतिवृष्टीमुळे दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही.
मुंबई : अतिवृष्टीमुळे दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी दहावी व बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना १३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर प्रवेश निश्चितीनंतर संपूर्ण प्रवेशप्रक्रिया अंतिम करण्यासाठी संस्थांना २३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) घेतला आहे. सुधारित वेळापत्रक डीटीईच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
दहावीनंतर थेट प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, दहावीनंतर थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आणि बारावीनंतर प्रथम वर्ष औषध निर्माण शास्त्र व हॉटेल मॅनेजमेंट पदविका अभ्यासक्रम अशा तीनही पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ज्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांना ९ आॅगस्टपर्यंत एआरसी केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चितीसाठी मुदत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश निश्चितीसाठी त्यांना १३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आ हे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर संपूर्ण प्रवेशप्रक्रिया अंतिम करण्यासाठी डीटीईने संस्थांना १९ आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता ही मुदत २२ आॅगस्टपर्यंत वाढविली असून, २३ आॅगस्टपर्यंत संस्थांना विद्यार्थ्यांची माहिती भरून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे.