मुदत संपली, वसुली सुरूच
By admin | Published: May 22, 2015 12:02 AM2015-05-22T00:02:45+5:302015-05-22T00:02:45+5:30
महापालिकेने सुरू केलेली पे अॅण्ड पार्क योजना वाहनधारकांच्या रोषाचे कारण ठरू लागली आहे. ठेकेदारांचे हित जोपासणारी ही दुकानदारी चांगलीच तेजीत आहे.
नवी मुंबई : महापालिकेने सुरू केलेली पे अॅण्ड पार्क योजना वाहनधारकांच्या रोषाचे कारण ठरू लागली आहे. ठेकेदारांचे हित जोपासणारी ही दुकानदारी चांगलीच तेजीत आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक कंत्राटांची मुदत संपली आहे. त्यानंतरही पार्किंगच्या नावाखाली वसुली सुरूच असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.
सायबर सिटीत पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीची सबब पुढे करून महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या परिसरांतील रस्त्यांवर पे अॅण्ड पार्किंग सुरू केले आहे. काही वर्षांपूर्वी वाशीच्या सेक्टर १७ मधील अंतर्गत रस्त्यांवर सर्वप्रथम ही योजना राबवण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तिचा इतर भागांत विस्तार करण्यात आला. सध्या नेरूळ, सीबीडी-बेलापूर, ऐरोलीसह शहरातील गर्दीच्या ठिकाणी पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात आले आहे. यातील बहुतेक ठेकेदार नवी मुंबई बाहेरचे किंवा त्या त्या भागातील नगरसेवकांशी हितसंबंध असणारे आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या नावाखाली हे ठेके चालविले जातात. विशेष म्हणजे यापैकी अनेक ठेक्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. तरीही वाहनधारकांची बिनबोभाट लूट सुरूच आहे. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या प्रकारला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याचे बोलले जाते.
शहरात फोफावलेल्या पे अॅण्ड पार्क संस्कृतीमुळे सध्या शहरातील कोणत्याही रस्त्यावर पाच मिनिटेही वाहन थांबवायचे असेल तर शुल्क भरावे लागते. यामुळे तेथील कर्मचारी आणि वाहनधारकांत शाब्दिक चकमकी उडतात. वाशीतील सेक्टर १७मध्ये तर या पार्किंग वसुलीचा कहर झाला आहे. या परिसरात मोठमोठे शोरूम्स, कार्पोरेट कार्यालये, राष्ट्रीय बँका, विकासकांची कार्यालये, हॉटेल्स व व्यापारी गाळे आहेत. त्यामुळे येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीची सबब पुढे करून या भागातील प्रत्येक रस्त्या पे अॅण्ड पार्कचे फलक लावले आहेत. त्यामुळे येथील हॉटेलमध्ये चहा प्यायचा असेल तरी पार्किंग शुल्क भरावे लागते. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्यामुळे दुकानदारही या व्यवस्थेवर वैतागले आहेत. वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावून ठेकेदारांचे हित साधणाऱ्या या योजनेत सुसूत्रता आणण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
महापालिका आणि वाहतूक विभागाने परस्पर धोरण ठरवून वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा. त्यासाठी पार्किंग शुल्क आकारून वाहनधारकांना वेठीस धरण्याची गरज काय, असा सवाल उत्कल कल्चरल अॅण्ड सोशल वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष सुशांत पटनायक यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)