मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे १ मार्च २०२० रोजी काढण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार व वारसांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३० दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच राज्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ही मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगारांना त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रथम सूचना पाठवण्यात आली होती. यानुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबई शाखेमध्ये कागदपत्रे सादर करण्यासाठी १२ जुलै ते ९ सप्टेंबरपर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीमध्ये अनेक कामगारांनी मुंबई बँकेत कागदपत्र सादर केलेली नाहीत. तसेच सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगारांना देण्यात आलेल्या प्रथम सूचना पत्रांपैकी काही सूचना पत्र पोस्टाकडून परत आलेली आहेत. या पत्रांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या यशस्वी कामगारांनी बँकेमध्ये कागदपत्रे सादर केले नाहीत त्यांनी ते वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातून स्वीकारून बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.