लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठीत फलक लावण्यासाठी दुकाने व आस्थापनांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनने केलेल्या याचिकेवर शुक्रवारी न्या. आर. डी. धानुका व न्या. कमल खता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. पालिकेने दिलेल्या मुदतवाढीत मराठीत फलक लावू, असे आश्वासन असोसिएशनतर्फे ॲड. विशाल थडानी यांनी दिल्याने न्यायालयाने याचिका निकाली काढली.
दुकाने व आस्थापनांवर मराठीत फलक लावण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने पालिका आयुक्तांकडे ८ जुलै रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावावर पालिका आयुक्तांनी निर्णय घेत ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. सुरुवातीला पालिकेने दुकाने व आस्थापनांना मराठीत फलक लावण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली होती.
पालिकेच्या या निर्णयाला असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले. पालिकेने संबंधित कायद्याअंतर्गत काढलेल्या सुधारित परिपत्रकात मराठीत फलक लावण्यासाठी निश्चित कालावधी नमूद केलेला नाही, असे असोसिएशनने याचिकेत म्हटले आहे. पालिकेने दिलेल्या मुदतीत मराठीत फलक लावले नाही तर ५००० रुपयांचा दंड बसेल. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अशा कारवाईपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी असोसिएशनने केली होती. मात्र, आता पालिकेने आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.