एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:12 AM2020-02-16T06:12:03+5:302020-02-16T06:12:07+5:30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिपत्रक जारी; अमर्याद कालावधीची सवलत संपुष्टात

Deadline for the MBBS course | एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादा निश्चित

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादा निश्चित

Next

मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मिळणारी अमर्याद कालावधीची सवलत संपुष्टात येणार असून प्रवेश घेतल्यापासून दहा वर्षांत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. यंदाच्या म्हणजे २०१९-२० या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपासून हा नियम लागू असेल. त्यासंबंधीचे निर्देश महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून एमबीबीएससाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र जुना अभ्यासक्रमही सुरू असल्याने महाविद्यालयीन पातळीवर हा अभ्यासक्रम राबविण्यात अडचणी आल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने हा विषय अभ्यास मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला आणि एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादेचा नियम करण्यात आला. यंदा प्रवेश घेतलेल्या तुकडीला (२०१९-२०) हा नियम लागू आहे.

पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम चार वर्षांत किंवा पुरवणी परीक्षेसह चार प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण करावा लागेल. एकूण अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जुनाच नियम लागू असेल.
गेल्या वर्षी वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. आतापर्यंत साडेचार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अगदी १२-१५ वर्षे घेणारे विद्यार्थीही पाहायला मिळत होते. मात्र, आताच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार त्यांना दहा वर्षांत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करावे लागेल.

बदलानुसार परीक्षांचे नियोजन
सध्या महाविद्यालयांमध्ये जुना आणि नवा असे दोन्ही अभ्यासक्रम सुरू आहेत. दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करताना गोंधळ होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या नियमित किंवा पुनर्परीक्षार्थीच्या परीक्षा मे-जूनमध्ये होतील, तर नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Deadline for the MBBS course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.