रस्त्यांच्या कामासाठी ‘डेडलाइन’
By admin | Published: April 9, 2016 03:56 AM2016-04-09T03:56:38+5:302016-04-09T03:56:38+5:30
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या रस्त्यांनी मुंबईकरांची गैरसोय होत असते़ त्यातच ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ते तयार करीत असल्याचे उजेडात आले आहे़
मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या रस्त्यांनी मुंबईकरांची गैरसोय होत असते़ त्यातच ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ते तयार करीत असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे पालिका आयुक्तांनी स्वत: यात लक्ष घालून रस्ते दुरुस्तीचा कृती आराखडा तयार केला आहे़ त्यानुसार पावसाळ्यापूर्वी ३६० रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची डेडलाइन आयुक्तांनी रस्ते विभागाला दिली आहे़
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ३ वर्षांचा अॅक्शन
प्लॅन तयार करण्यात आला आहे़ त्यानुसार टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण केले जात आहे़ त्यानुसार १०१७ रस्त्यांच्या कामांपैकी २५८ कामे सध्या सुरू आहेत़ त्यात आणखी १०२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य रस्ते विभागाला देण्यात आले आहे़ उर्वरित ६५८ रस्त्यांची कामे एप्रिल २०१७पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत़ रस्ते दिलेल्या वेळेतच पूर्ण व्हावेत, यासाठी आयुक्त वेळोवेळी रस्ते विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आहेत़ त्यानुसार कामाचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे़ मात्र रस्ते घोटाळ्याच्या चौकशी अहवालात ५ अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे़ त्यामुळे पावसाळ्याला अवघे २ महिने उरले असल्याने आयुक्तांच्या या आदेशाने रस्ते विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे़ (प्रतिनिधी)