मंडपाच्या परवानगी अर्जासाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:02 AM2019-06-22T01:02:10+5:302019-06-22T01:04:29+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप बांधण्याच्या परवानगीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप बांधण्याच्या परवानगीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. रस्त्यावर मंडप बांधणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मंडळांना पायपीट करावी लागणार नाही. मात्र, १९ ऑगस्टपर्यंत या परवानग्या एकत्र मिळण्यासाठी मंडळांना अर्ज करावा लागणार आहे.
मुंबईत १२ हजार छोटी व मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना यापूर्वी विविध परवानगींसाठी एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करावी लागत होती. मात्र, गेल्या वर्षीपासून पालिकेने एक खिडकी योजना सुरू केली. या वर्षी २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्याने दोन महिने आधी म्हणजे १५ जूनपासून www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
सार्वजनिक मंडळांना अध्यक्षांचे नाव, मंडपाचे ठिकाण, स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक नगरसेवक यांची माहिती द्यावी लागते. हा अर्ज करण्याची मुदत १९ आॅगस्ट रोजी संध्याकाळी संपेल. मात्र, मूर्तिकारांना ही परवानगी घेण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.