डेडलाइन पुन्हा चुकली : निकालास आणखी उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:58 AM2017-09-01T04:58:30+5:302017-09-01T05:00:07+5:30

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन आज पुन्हा एकदा हुकली. कारण उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ घेऊनही दिलेल्या वेळेत निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे.

Deadlines re-run: More delays to get out | डेडलाइन पुन्हा चुकली : निकालास आणखी उशीर

डेडलाइन पुन्हा चुकली : निकालास आणखी उशीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन आज पुन्हा एकदा हुकली. कारण उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ घेऊनही दिलेल्या वेळेत निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. सहाव्यांदा मुदतवाढ घेताना विद्यापीठाने गणेशोत्सव व २९ आॅगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसाची सबब पुढे केली आहे. मात्र विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने न्यायालयाने सीईटी विभागाला लॉ सीईटीची मुदत ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले.
यापूर्वी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार होते. मात्र दिलेले आश्वासन मुंबई विद्यापीठ पूर्ण करू शकले नाही. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधि अभ्यासक्रमाचे तीन विद्यार्थी व अन्य काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. यावरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती.
गेल्या सुनावणीत न्यायालयाने विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत वेळ दिली. तर सीईटी विभागाने स्वत:हून लॉ सीईटीसाठी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत विद्यापीठ मूल्यांकनाचे काम पूर्ण करू शकले नाही. गणेशोत्सव आणि मंगळवारी शहरात पाणी साचल्याने मूल्यांकनाचे काम पुन्हा मागे पडले आहे. ते पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागतील, असे विद्यापीठाचे वकील रुई रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीईटी विभागाला लॉ सीईटीची मुदत ६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले.
एलएलबीच्या तीन आणि पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले असून, निकाल गुरुवारी संध्याकाळी जाहीर होतील, असे रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. ‘कला शाखेच्या १५३ अभ्यासक्रमांपैकी १५१ अभ्यसक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर बीएस्सीच्या ४७ अभ्यासक्रमांपैकी ४३ अभ्यासक्रमांचा निकाल लावला आहे. तसेच बीकॉमच्या ५० अभ्यासक्रमांपैकी ३० अभ्यासक्रमांचा निकाल लावला आहे,’ अशी माहिती रोड्रीग्स यांनी न्यायालयाला दिली.
सीईटी विभागाने ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची कशीबशी तयारी दर्शवली. मात्र न्यायालयाने आणखी एक दिवस मुदतवाढ देण्याचे निर्देश सीईटी विभागाला दिले. ‘हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, काहीही चूक नसताना त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश घेऊ शकत नाहीत. केवळ त्यांच्याकडे गुणपत्रिका नसल्याने त्यांची अडवणूक होत आहे. तुम्ही त्यांची असाह्यता समजून घ्या,’ असे म्हणत न्यायालयाने लॉ सीईटीची मुदत ६ स्पटेंबरपर्यंत वाढवली.

‘मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मनुष्यबळ कमी पडले. त्यामुळे इंटरनेटही बंद पडले. सर्वरही क्रॅश झाले. त्यामुळे निकाल वेबसाइटवर अपलोड करता आले नाहीत,’ असेही रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. तत्काळ गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संबंधित महाविद्यालयांत गॅझेट किंवा ब्रॉडशीट पाठवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे गुण महाविद्यालयांत जाऊन पाहू शकतील, असे विद्यापीठाने न्यायालयाला सांगितले.

नवे संकेतस्थळ : गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील निकाल पाहण्यात अडचणी येत असल्याने विद्यापीठाने गुरूवारी नवीन संकेतस्थळाची घोषणा केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संकेतस्थळावर निकाल जाहीर होऊनही अनेक विद्यार्थ्यांना ते दिसत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. परिणामी, विद्यार्थ्यांची तक्रार दूर करण्यासाठी परीक्षा विभागाने www.mumresults.in हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र नव्या संकेतस्थळावर गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेले निकाल दिसत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांमधून होत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या निकालातील गोंधळ कायम आहे. प्रशासनाने गुरूवारी एकूण ३ निकाल जाहीर केले असले, तरी ४७७ निकालांमधील अद्याप ४४७ निकालच जाहीर झालेले आहेत. त्यामुळे उरलेले ३० निकाल किती दिवसांत लावणार? याबाबतचे उत्तर देण्यास विद्यापीठातील अधिकारी तयार नाहीत.

Web Title: Deadlines re-run: More delays to get out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.