जीवघेण्या चौपाट्या!

By admin | Published: December 13, 2015 02:51 AM2015-12-13T02:51:55+5:302015-12-13T02:51:55+5:30

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चौपाट्याच मुंबईकरांच्या जिवावर उठत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईतील चौपाट्यांवर १५९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी

Deadly Bouquet! | जीवघेण्या चौपाट्या!

जीवघेण्या चौपाट्या!

Next

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चौपाट्याच मुंबईकरांच्या जिवावर उठत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईतील चौपाट्यांवर १५९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त झाली आहे.
मुंबईकरांसह पर्यटकांना लांबच लांब समुद्रकिनारे नेहमीच खुणावत असतात. मुंबईत फिरायच्या ठिकाणांत या चौपाट्यांचा नेहमीच अग्रक्रम लागतो. मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे मुंबईचे महत्त्व वाढते. पण हेच किनारे अनेकदा धोकादायक ठरतात. उत्साहाने समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर योग्य ती काळजी न घेतल्याने गेल्या पाच वर्षांत १५९ जणांना जीव गमवावा लागल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर नेहमीच गर्दी असते. पण पावसाळ्यात गर्दीला उधाण येते. पावसाळ्यात जोरदार पाऊस कोसळायला लागला की मुंबईकरांसह पर्यटकांना चौपाट्या खुणावायला लागतात. जोरदार कोसळणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी चौपाट्यांवर गेलेल्या अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात समुद्रात ४.५ मीटरपेक्षा अधिक लाटा उसळणार असतील तर महापालिका सावधानतेचा इशारा देते. त्या वेळी चौपाट्यांवर संरक्षणासाठी सुरक्षारक्षक तैनात केले जातात. पण तरीही होणाऱ्या अपघातात घट झालेली दिसून आलेली नाही.
२०११ ते २०१५ या पाच वर्षांत अपघातांमध्ये घट झालेली नाही. २०१४ मध्ये ३५ जणांचा तर २०१५ मध्ये जानेवारी ते आॅगस्ट या ८ महिन्यांत २९ जणांचा मृत्यू आणि ६ जण जखमी झाले. २८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. २०१४ मध्ये चौपाट्यांवर एकही जखमी झाला नसल्याची नोंद आहे, तर १८ जणांना वाचवण्यात आले.
पावसाळ्यात ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्यास महापालिका प्रशासन येथे सुरक्षारक्षक तैनात करतात. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक आणि मुंबई पोलीस तैनात करण्यात येतात. मात्र चौपाटीवर नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असे पालिकेचे म्हणणे आहे. केवळ पावसाळा नाही तर हिवाळा आणि उन्हाळ्यातही चौपाटीवर अशा दुर्घटना होत असतात. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deadly Bouquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.