मुंबई : मलबारहिल मधील ७८ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाला मर्सिडीजची फ्री सर्व्हिस भलतीच महागात पडली आहे. सर्व्हिसिंगच्या नावाखाली आरोपी दोन मर्सिडीज घेवून पसार झाला. एवढंच नाही तर, दोन्ही कार पुण्यात विक्रीसाठी ठेवल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. आरोपीच्या अटकेसाठी पथक पुण्याला रवाना झाले आहे.
मलबार हिलचे रहिवासी असलेले व्यापारी निलेश पवित्रलाल मेहता (७८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास सिद्दीकी मोहमद इक्बाल कयुम (४०) हा त्यांच्या घरी आला. त्याने, मर्सिर्डीज ऑटो हंगर शो रूम मधून आल्याचे सांगत गाड्या विषयी चौकशी करण्यास सुरुवात केली. मेहता यांनी जवळील दोन मर्सिडीज गाड्याबाबत सांगताच, त्याने मोफत सर्व्हिस देण्याचे आमिष दाखवले. या गाडयाची सव्र्हिसिंग, डेंटिंग, पेंटिंग आणि रिपेअरींग ही कामे कंपनीकडुन मोफतमध्ये करून दिली जात असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. मेहता यांनीही त्याच्या बोलण्यात अडकवून दुसऱ्या दिवशी गाड्या त्याच्या ताब्यात दिल्या. सोबतच, त्याने तपासणीचा नावाखाली त्यांची कागदपत्रेही मिळवली.
१२ ऑगस्टपासून, त्यांनी गाडी परत देण्याबाबत इकबाल कडे चौकशी करताच त्याने काम बाकी असल्याचे सांगून टाळाटाळ सुरू केली. गाडीबाबत पाठपुरावा सुरू असतानाच, गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून कारच्या विक्रीबाबत चौकशी केली. मात्र, आपल्याला कुठलीही गाडी विकायची नसल्याचे सांगितले.
कॉल धारकाकडे अधिक चौकशी करताच, त्यांच्या दोन्ही मर्सिडीज पुण्यात विक्रीसाठी असल्याचे सांगितले.त्यांनी, तात्काळ सबंधित विक्रेत्याशी पुण्यात चौकशी करताच, इक्बालभाई कडून ५० हजार अॅडव्हान्स दलाली देउन विक्रीसाठी घेतल्याचे समजल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी, सबंधिताना घडलेला प्रकार सांगून, गाडी विक्री करू नये याबाबत सांगून पोलीस ठाणे गाठले. ८० लाख किंमतीचे वाहने घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत, मलबार हिल पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पुणे येथे रवाना झाले आहे.
आरोपी विरोधात ५ ते ६ गुन्हे
तक्रारदार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरोधात यापूर्वीही पाच ते सहा गुन्हे असल्याचे समजते आहे. तो सराईत आहे. मी त्याच्या बोलण्यात अडकल्याने फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही गाड्या सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.