मुंबई : अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टर व एजंटसह पाच महिलांच्या टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्युलीया फर्नांडिस विरोधातील हा सातवा गुन्हा आहे. नर्सिंग होममध्ये येणाऱ्या गरीब व गरजू महिलांना हेरायचे. पैशांचे आमिष देत त्यांच्या नवजात बालकांची ७ ते १० लाखांत विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती कारवाईतून समोर आली.
शिवाजी नगर भागात बाळांची विक्री होत असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उप निरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाणेकर यांच्या पथकाने तपास करत दोन महिलांना नवजात बालकासह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला.
तपासात नर्सिंग होमचे कनेक्शन उघडकीस येताच शिवाजी नगर येथील रेहमानी नर्सिंग होमच्या मदतीने या रॅकेटची मास्टरमाइंड ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस ही रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बोगस डॉक्टर सायराबानो नबीउल्ला शेख, दलाल गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख या पाच जणींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन नवजात बालकांनाही ताब्यात घेतले. त्यांनी एका बाळाची ५ लाखांत विक्री केल्याचे समोर आले.
फर्नांडिस ही बोगस डॉक्टर सायराबानो तसेच दलाल महिलांच्या मदतीने गरीब, गरजू तसेच नवऱ्याने टाकलेल्या महिलांचा शोध घ्यायची.
त्यांना डिलिव्हरीचा खर्च तसेच पुढे बाळाच्या बदल्यात पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढायची.
प्रसूतीपर्यंत महिलांची देखभाल करायची. प्रसूतीनंतर बाळाच्या शोधात असलेल्या दाम्पत्यांना त्यांची विक्री करत होती.
चाळीतले घर बनले नर्सिंग होम
शिवाजी नगर येथील एका छोट्याशा क्लिनिकला नर्सिंग होम बनवत गेल्या वर्षभरापासून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
सायराबानो ही दहावी पास असून तिने रेडिओलॉजीचे शिक्षण घेतले आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ५२ प्रसूती या नर्सिंग होममध्ये झाल्या. तपासात हे नर्सिंग होमही अनधिकृतपणे थाटल्याचे स्पष्ट झाले.
नॉर्मल डिलिव्हरी असलेल्या महिलांना ती हाताळायची. सिझेरियन प्रसूती असल्यास शताब्दी किंवा अन्य रुग्णालयात पाठवत होती.