अविवाहिताच्या मुलांशी महापालिकेचा व्यवहार? मुलुंड प्रकल्पबाधित घरे प्रकरण, निव्वळ नामसाधर्म्य कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:23 AM2024-03-01T10:23:30+5:302024-03-01T10:23:53+5:30
मुलुंडमधील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेतर्फे मूक मानवी साखळी उभारण्यात आली होती.
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील वझे-केळकर कॉलेजजवळील परिसरात प्रकल्पबाधितांसाठी मुंबई महापालिकेकडून सुमारे साडेसात हजार घरे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे मुलुंडची लोकसंख्या ४० ते ५० हजारांनी वाढणार आहे. परिणामी पायाभूत सुविधांवर ताण येणार असल्याचे कारण पुढे करत मुलुंडवासियांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन छेडले असतानाच ज्या जागेवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे त्या जागेच्या मालकीहक्कावरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. नामसाधर्म्याचा फायदा घेत मूळ जमीन मालक अविवाहित असताना त्यांना नसलेल्या मुलांशी येथील जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मुलुंडमधील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेतर्फे मूक मानवी साखळी उभारण्यात आली होती. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. ‘प्रयास’चे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी माहिती अधिकारात काढलेल्या कागदपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकल्पाचे टेंडर मुंबई महापालिकेने पुणे ईस्ट रिअल्टी व श्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले. तसेच, त्या शेजारील जागेवर पालिकेतर्फे विकासकाला देण्यात आलेली बांधकाम परवानगीसुद्धा याच पद्धतीने देण्यात आली. या जागेचा व्यवहार मूळ मालकांनी न करता, काही नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तींनी, मालक असल्याचे भासवून जागेचा व्यवहार केला आहे. याबाबत मूळ मालकांनी अनेकदा आक्षेप घेतले होते. त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केराची टोपली दाखवली होती. याबाबत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांना पुराव्यासहित तक्रार दिली असून, त्वरित या दोन्ही कामांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘टायटल क्लीअर’चा भंग
या प्रकल्पाच्या टेंडरमध्ये, जागा मालकीबाबत कोणताही वाद नको म्हणजेच टायटल क्लीअर असणे, ही स्पष्ट अट आहे. या अटीचा या प्रकरणात भंग झालेला असून चौकशी होईपर्यंत त्वरित काम बंद करावे, अशी मागणी ॲड. देवरे यांनी केली आहे.
‘ही जागा आजी-आजोबांची’
मूळ मालक सोवार रामजी वैती हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात नामदेव आणि गणपत हे दोघे बंधू होते.
उभयतांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी या जागेवर मालकी हक्क दाखवत २०१० मध्ये तसे अधिकृत प्रमाणपत्र मिळवले. यामध्ये नामदेव यांच्या दोन मुलींच्या मुलांना वारस न दाखवल्याने त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता.
यातच, सोवार वैती या नावाचा आधार घेत काहींनी त्यांची मुले असल्याचा दावा करत हक्क मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. नामदेव यांच्या मुलीचा नातू राहुल भंडारी यांनीही याबाबत आम्हालाही न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले.