Join us

धांगडधिंग्यापेक्षा मेलडीच प्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 4:58 AM

गणेशोत्सवात येणाऱ्या गाण्यांमध्ये धांगडधिंगा नसावा.

- अशोक पत्कीगणेशोत्सवात येणाऱ्या गाण्यांमध्ये धांगडधिंगा नसावा. गाण्याचे शब्द, त्याची चाल ही लोकांना आवडणा-या मेलडीसारखी असावी.मराठी मनात गणेशोत्सवाचे एक आदराचे स्थान आहे. या उत्सवांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संगीत हा धागा असतो. त्यामुळे कोणताही सण असू द्या तो सण जवळ आला की रिमिक्स गाण्यांची जत्राच उघडते. गणेशोत्सवाच्या काळातही ही गाणी आता यायला सुरुवात होईल. या वर्षीच्या लोकप्रिय मराठी व हिंदी गाण्यांवर बाप्पांचे शब्द चपखल बसवून श्रवणीय गाणी बनवण्याचा सपाटा सुरू होईल. वैयक्तिकरीत्या माझा या गोष्टीला विरोध नाही. कारण संगीत बदलतेय, लोकांची आवड बदलतेय, नवीन-नवीन ट्रेंड संगीत क्षेत्रात येतोय. मात्र सगळ्या प्रकारांत आपण या गाण्यातली मेलडी हरवून बसलोय. अशी गाणी यावीत पण त्यात धांगडधिंगा नसावा. चाल नवी असो वा रिमिक्स, पण त्या गाण्याचे शब्द, त्याची चाल ही लोकांना आवडणाºया मेलडीसारखी असावी, असे माझे ठाम मत आहे.मला आठवते माझ्या लहानपणी प्रत्येक गणेशोत्सवाला आम्हाला उत्सुकता असायची की या वेळी गणेशोत्सवात आकाशवाणीवर नवीन गाणे कोणते येणार? आम्ही त्याची चातकासारखी वाट पाहायचो. वसंत प्रभू, भा. रा. तांबे आणि जोडीला लता मंगेशकरांचा आवाज. अहाहा... काय काळ होता तो! ही गाणी उत्सवात रोज वाजवली जायची, मात्र ही गाणी कधी कर्कश्य वाटली नाहीत. कारण त्या गाण्यांत एक टेम्पो असायचा, चाल तर अप्रतिमच असायची आणि दिग्गज गीतकार, कवींच्या शब्दाने या गाण्याला एक उभार यायचा. आजच्या गाण्यात हे काहीसे हरवत चाललेय असे वाटते. माझ्याकडेही अनेक वेळा गणपतीच्या वेळी अनेक निर्माते येतात आणि मला अशा टाइपचे गाणे करून द्या, असा हट्ट धरतात. मात्र मी त्यांना साफ नाही सांगतो. हे माझे काम नव्हे. गेली ५० वर्षे मी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र अशी गाणी करावी असे मला कधीच वाटले नाही. मुळात ती माझी स्टाईल नाही. टेक्नोलॉजी बदललीय. स्टुडिओतही अनेक प्रकारचे साउंड आले आहेत. पण तरीही आजही मेलडी असलेले गाणे लोकांच्या मनात घर करते. अशाच प्रकारचे एक गाणे घेऊन मी या वर्षी गणेशोत्सवात येतोय. जसराज जोशी या गायकाने हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे या गाण्याने मी संगीतकार म्हणून नाही, तर कवी आणि संगीतकार म्हणून रसिकांसमोर येणार आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच शहनाईचा वापर मी केलाय. रिदमचा मारा न करता एक शांत हळुवार पण तितकीच श्रवणीय चाल मी बांधलीय. मी परत म्हणतो, धांगडधिंगा आणि दाणादाण करून तुम्ही गाणे हिट करू शकाल; पण चिरकाल लोकांच्या मनात घर करून राहील असे गाणे फक्त मेलडीच देऊ शकते.(शब्दांकन : अजय परचुरे)निर्मात्यांची मागणी बदललीय. मला याच साच्यात गाणे बनवून दे. लोकांना तेच आवडते अशी मागणी वाढते आहे. त्यामुळे लोकांना आकर्षित करणारी, मेलडी नसणारी व दाणदाण करणारी गाणी बनत आहेत. पण ही गाणी वर्षानुवर्षे टिकत नाहीत. ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासारखे दिग्गज कवी, गीतकार आता राहिले नाहीत हे दुर्दैव आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव