लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी रात्री नऊच्या दरम्यान काँक्रीट मिक्सरच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्या शेजाऱ्याने सचिनला ट्वीट करून तुझ्या घराबाहेर चाललेले काम कृपया थांबवशील का, अशी विनंती केलेले ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या ट्वीटवर स्वतः सचिनने जरी अद्याप उत्तर दिलेले नसले तरी यामुळे सोशल मीडियावर मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
वांद्र्यातील पेरी क्रॉस रोड येथे सचिनचा बंगला आहे. बंगल्याबाहेर काँक्रीट मिक्सरचे मोठे मशीन तिथे कार्यरत आहे. हे काम रविवारी दिवसभर सुरू होते. रात्री नऊ वाजले तरी ते काम सुरू असल्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या दिलीप डिसुझा या व्यक्तीने हे ट्वीट केले आहे.
या ट्वीटमध्ये सचिनला टॅग केल्यामुळे हे ट्वीट काही मिनिटांतच व्हायरल झाले. त्यानंतर मात्र लोकांनी डिसुझा याला चांगलेच सुनावले आहे. एकाने सांगितले की, अशा पद्धतीच्या कामाची परवानगी महापालिकेतर्फे रात्री दहापर्यंत दिली जाते. आता तर नऊच वाजले आहेत. त्यामुळे सचिनने काही चुकीचे काम केलेले नाही. तर, दुसऱ्याने लिहिले की एवढीच अडचण आहे तर सचिनला टॅग करण्यापेक्षा १०० नंबरवर फोन करून पोलिसांना सूचित करायचे. आणखी एका व्यक्ती डिसुझा सचिनला टॅग करून स्वतःची प्रसिद्धी करू पाहत असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.