Join us

आपणास सविनय जयभीम... जितेंद्र आव्हाडांचं प्रकाश आंबेडकरांना पत्र, ही एकच विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:33 PM

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई - वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढल्यास लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ विरुद्ध भाजप, अशीच लढत रंगणार असल्याचा दावा करीत वास्तव लक्षात घेऊन महाविकास आघाडीने वाटपासंदर्भात आपसातील सेटलमेंट तातडीने करावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले. त्यामुळे, आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. त्यातच, प्रकाश आंबेडकरांनी आजपासून जाहीर संभांना सुरुवातही केली आहे. त्याच अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना विनंतीपर पत्र लिहिले आहे. 

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतच यावे, असा आग्रह केला आहे. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढल्यास किमान सहा जागांवर निवडून येईल, असा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला. ‘वंचित’ कोणत्या जागांबाबत आग्रही आहे, यासंदर्भात मविआला माहिती दिली होती. काही सूचनाही मांडल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील ४८ पैकी १५ ओबीसी उमेदवार असावे, किमान ३ उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे असावे आणि घटक पक्षांनी आम्ही यापुढे भाजपसोबत युती करणार नाही, असे धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करावे, या सूचनांसंदर्भात मविआ काय निर्णय घेते ते पाहू, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

काँग्रेस-शिवसेनेत १५; शिवसेना-राष्ट्रवादीत ९ जागांवर वाद! महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात १५ जागांमध्ये वाद आहे. तर, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात ९ जागांवर वाद असल्याचे सांगत, घटक पक्षांनी जागा वाटपासंदर्भात समन्वय तातडीने साधावा, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

अद्याप घाेषणा नाही  ‘मविआ’साेबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या काेणत्याही कार्यक्रमात ‘वचिंत’च्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. ‘वचिंत’कडून वर्ध्यात प्रा. राजेंद्र साळुंखे, सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याची माहिती चुकीची असल्याचे प्रवक्ते डाॅ़ धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडप्रकाश आंबेडकरमुंबईनिवडणूक