https://www.lokmat.com/topics/maharashtra-assembly-election-2019/नवी दिल्ली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन होत आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा सुरू होईल, तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. Dear उद्धव ठाकरे, असे म्हणून सोनिया यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकणार नाहीत, हे स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना, डिअर उद्धव ठाकरे... असे म्हणून सोनियांनी पत्राची सुरुवात केली. तुमच्या नवीन राजकीय कारकिर्दीस माझ्याकडून व्यक्तिगत शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेचं हित आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार काम करेल. मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचंही सोनियांनी म्हटलंय. तर, भाजपाच्या एकाधिकारशाहीला देशातील जनता तोंड देतेय. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ बनलं असून अर्थव्यवस्था कोलमडलीय, असेही सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.