- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका १५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. उपनगरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे बांगुरनगर परिसर जलमय झाला होता. त्यातच हा खड्डा न दिसल्याने यात पडून मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मालाडच्या एव्हरशाईन परिसरात राहणारे एक गृहस्थ जॉगिंगसाठी निघाले होते. तेव्हा त्यांना या गटाराच्या खड्ड्यात काही तरी तरंगताना दिसले. 'मला वाटले एखादा नारळ पाण्यात तरंगत आहे. त्यामुळे मी एक लाकडाचा बांबू घेऊन त्याला ढोंगसायला सुरवात केली. तेव्हा मला नाक, तोंड आणि डोळे दिसले आणि मी जाम घाबरलो. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करून याबाबत कळविले', अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने 'लोकमत' शी बोलताना दिली.त्यानंतर काही मुले त्याठिकाणाहून येत होती. त्यांना मी या मुलाची ओळख विचारली. ज्यांनी पाण्यात बुडालेला मुलगा आमच्या शेजारी राहत असल्याचे सांगत एकाने धावत जाऊन त्याच्या कुटुंबातील लोकांना बोलावून आणले. तितक्यात त्याठिकाणी बांगुरनगर पोलीस पोहोचले आणि त्यांनी मुलाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून स्थानीक रुग्णालयात नेला. संबंधित मुलाने नुकतेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण करुन महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गोरेगावमध्ये गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 12:27 PM