पंधराव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू! हत्या की आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:08 AM2017-12-12T03:08:14+5:302017-12-12T03:08:24+5:30
इमारतीच्या १५व्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार मालवणी परिसरात घडला. ती तिच्या मित्रासोबत त्याच्या मित्राकडे पेइंग गेस्ट म्हणून राहात होती. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई : इमारतीच्या १५व्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार मालवणी परिसरात घडला. ती तिच्या मित्रासोबत त्याच्या मित्राकडे पेइंग गेस्ट म्हणून राहात होती. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
अर्पिता तिवारी असे या तरुणीचे नाव आहे. ती मीरारोडची रहिवासी असून, तिचा मित्र गोरेगावचा राहणारा आहे, ज्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. अर्पिताचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता. मालवणीतील कच्चा रस्ता परिसरात असलेल्या मानवस्थल इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर १५०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये या दोघांचा एक मित्र राहतो. त्याच्या घरी दोघे गेल्या पाच वर्षांपासून पेइंग गेस्ट म्हणून राहतात. अर्पिताच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी त्याला जाग आली आणि तो बाथरूमकडे गेला. तेव्हा बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता. अर्पिताच आत असेल, असे वाटून तो पुन्हा जाऊन झोपला. काही वेळाने तो पुन्हा उठला आणि बाथरूमकडे गेला. तेव्हाही दरवाजा बंदच होता. त्यामुळे त्याने अर्पिताच्या मित्राला उठवले. त्यांनी बाथरूमच्या खिडकीतून वाकून पाहिले, तेव्हा दुसºया मजल्याच्या डस्ट फ्लोअरवर अर्पिता त्यांना मृतावस्थेत आढळली.
सुसाइड नोट नाही!
रविवारी रात्री अर्पिता आणि तिचे दोन्ही मित्र दारूच्या नशेत होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्पिताने लिहिलेली सुसाइड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली की हा अपघात होता, याची चौकशी मालवणी पोलीस करत आहेत.