Join us

अठरा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 6:01 AM

कुटुंबीयांसमवेत माळशेज घाट येथे सहलीला गेलेल्या आणि पायावर दरड पडल्याने जखमी झालेल्या विरार येथील अंजली सूर्यकांत सावंत (वय २८) हिचा शनिवारी मृत्यू झाला.

मुंबई : कुटुंबीयांसमवेत माळशेज घाट येथे सहलीला गेलेल्या आणि पायावर दरड पडल्याने जखमी झालेल्या विरार येथील अंजली सूर्यकांत सावंत (वय २८) हिचा शनिवारी मृत्यू झाला. गेले अठरा दिवस तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा एक पाय निकामी करण्यात आला होता. मात्र, संसर्ग शरीरभर पसरल्याने अठरा दिवसांनंतर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणारी अंजली ही दोन बहिणी, भाऊ तसेच आईवडिलांसह विरारला राहत होती. तिचे वडील नुकतेच ‘बेस्ट’मधून निवृत्त झाले होते. अंजली कुटुंबासह १४ जुलैला सहलीला गेली होती. त्या वेळी अचानक माळशेज घाटातील दरड कोसळली. त्याचा काही भाग अंजलीच्या डाव्या पायावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेल्याने तिला चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. मात्र, संसर्ग शरीरभर पसरल्याने शनिवारी पहाटे चारच्या सुमारास तिचे निधन झाले. अंजलीची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. अंजलीला वेळीच चांगले उपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असती, असे तिचे मामा अमितकुमार शिंदे यांनी सांगितले.