मुंबई : तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे अॅलर्जी झालेल्या सायरा शेख (47) हिचा मृत्यू मंगळवारी रात्री 11.3क् च्या सुमारास केईएम रुग्णालयामध्ये झाला. सायरा हिला कुर्ला भाभा रुग्णालयातून सोमवारी मध्यरात्री 12.45 च्या सुमारास केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. अॅलर्जी झालेल्या इतर महिलांची प्रकृती स्थिर आहे.
सायरा हिला केईएम रुग्णालयात आणले तेव्हा तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. याचबरोबरीने तिचा रक्तदाबही कमी झाला होता. तिची तपासणी करण्यात आल्यावर तिला अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले होते. यानंतर तिची काही प्रमाणात शुद्ध हरपली होती. मंगळवारी रात्री 11.3क् च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल अजून न आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे केईएम रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.
कुर्ला भाभामधील ज्या इंजेक्शनमुळे रुग्णांना अॅलर्जी झाली आहे, त्याचा नमुना अन्न व औषध प्रशासनाने घेतलेला आहे. तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. 8 ते 1क् दिवसांत अहवाल आल्यावरच नक्की काय झाले आहे हे सांगता येईल, असे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त एस. पाटील यांनी सांगितल़े
महापालिकेच्या मेडिसीन आणि फार्माेकॉलॉजी विभागाच्या डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात येणार असून, कशामुळे अॅलर्जी झाली याचा शोध हे डॉक्टर घेणार आहेत. इंजेक्शन अॅलर्जीप्रकरणी चौकशी करण्यास एक समिती नेमण्यात आली आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले.