Join us

पीएमसी बँकेच्या मुलुंडमधील आणखी एका खातेदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 4:05 AM

जिंदानी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. पैसे खात्यात अडकल्यामुळे त्यांना बँकेत अडकलेल्या पैशांची चिंता सतावत होती.

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) आणखी एका खातेदाराचा गुरुवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रताप जिंदानी असे खातेदाराचे नाव असून ते ७१ वर्षांचे होते. आतापर्यंतचा हा मुंबईतला आठवा मृत्यू आहे.मुलुंडमध्ये जिंदानी हे कुटुंबासह राहायचे. त्यांचा मृत्यू या घोटाळ्यामुळे झाला नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी नमूद केले. जिंदानी यांचा मुलगा स्पेनहून येत आहे. तो येताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारआहेत. जिंदानी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. पैसे खात्यात अडकल्यामुळे त्यांना बँकेत अडकलेल्या पैशांची चिंता सतावत होती.पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) लादलेल्या निर्बंधानंतर बँक खात्यात पैसे अडकल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. या तणावात ओशिवरातील रहिवासी संजय गुलाटी यांचा पहिला बळी गेला. त्यापाठोपाठ खातेदारांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. खातेदार हक्कांच्या पैशांसाठी आंदोलन करत आहेत. लवकरात लवकर पैसे मिळावे, अशी मागणी त्यांच्याकडून सुरूच आहे.यापूर्वीच्या घटना- १४ आॅक्टोबर : ओशिवारा येथे राहणारे संजय गुलाटी जेट एअरवेजमध्ये कामाला होते. जेट एअरवेज बंद झाल्याने नोकरी गेली. त्यात पीएमसी बँकेमधील खात्यातील पैशांवर निर्बंध आले. बँकेविरुद्धचे आंदोलन उरकून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे ९० लाख बँक खात्यात होते.- १५ आॅक्टोबर : पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या मुलुंडमधील भट्टोमल पंजाबी यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.- १५ आॅक्टोबर : पीएमसी बँक खात्यात १ कोटी असलेल्या वर्सोव्यातील डॉ. योगिता बिजलानी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.- १८ आॅक्टोबर : मुलुंड कॉलनीतील रहिवासी असलेले मुरलीधर धर्रा (८३) यांचा मृत्यू झाला. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यांचे ६० हजार रुपये बँक खात्यात होते.- २० आॅक्टोबर : मुलुंडच्या रहिवासी असलेल्या भारती सदारंगानी (७३) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे अडीच कोटी रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत.- ३१ आॅक्टोबर : मुलुंडचे रहिवासी आणि पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या केशुमलभाई हिंदुजा (६८) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

टॅग्स :पीएमसी बँक