ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १३ - पोलीस भरतीदरम्यान जखमी झालेल्या आणखी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. विशाल केदारे असे या तरूणाचे नाव असून त्याच्यावर मुलुंडमधील प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू होते. पोलीसरभरती दरम्यान झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
मूळचा नाशिकचा रहिवासी असलेला विशाल पोलीस भरतीसाठी मुंबईत आला असता बुधवारी तो जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वी दोन तरूणांचा पोलीसभरतीदरम्यान मृत्यू झाला होता. मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला. मैदानी चाचणीत चार कि.मी.चे अंतर धावल्यानंतर अंबादास कोसळला. त्याला सायन रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. तर ठाणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी आलेल्या साईप्रसाद माळी याला भरतीदरम्यान चक्कर आली. त्याला वाशीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला.