रेल्वे पोलीस दलातील सहायक निरीक्षकाचा मृत्यू
By Admin | Published: June 18, 2017 01:06 AM2017-06-18T01:06:35+5:302017-06-18T01:06:35+5:30
रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक आप्पासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पाटील यांचा दादर ते परेल स्थानकादरम्यान रेल्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक आप्पासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पाटील यांचा दादर ते परेल स्थानकादरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आहे की आत्महत्या, या अनुषंगाने दादर रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. येत्या १ जुलैला पाटील यांच्या मोठ्या मुलाचे लग्न आहे; त्यातच अशी दुर्दैवी घटना घडल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रेल्वे पोलीस दलातील १९८२च्या भरती प्रक्रियेत पाटील हे सेवेत रुजू झाले होते. दादर येथील स्वामी नारायण मंदिराजवळील पोलीस वसाहतीत पाटील पत्नीसह राहत होते. त्यांची दोन्ही मुले खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यापैकी पुणे येथे कामावर असलेल्या मोठ्या मुलाचे १ जुलै रोजी लग्न आहे. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती. ३१ डिसेंबर २०१८ रोजी पाटील हे निवृत्त होणार होते. दरम्यान, या दुर्घटनेमुळे दादर येथील पोलीस वसाहतीवर शोककळा पसरली आहे. पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्करासाठी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात त्यांच्या गावी पाठवले आहे. पाटील यांच्या अपघाताची माहिती मिळताच दादर पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह स्टेशन मास्टर आणि अन्य सहकारीदेखील घटनास्थळी पोहोचले.