Join us

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू

By admin | Published: January 02, 2016 8:34 AM

तुर्भे नाकामधील रिक्षाचालक नागेंद्र सोनकांबळे यांचा बुधवारी रात्री अपघात झाला. त्याला उपचारासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात नेले, परंतू जागा नसल्याचे सांगून उपचारास नकार दिला.

नवी मुंबई : तुर्भे नाकामधील रिक्षाचालक नागेंद्र सोनकांबळे यांचा बुधवारी रात्री अपघात झाला. त्याला उपचारासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात नेले, परंतू जागा नसल्याचे सांगून उपचारास नकार दिला. हिरानंदानी रुग्णालयानेही रुग्णास बाहेरचा रस्ता दाखविला. दोन तास उपचार न मिळाल्यामुळे रुग्णालय आवारामध्येच त्यांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च आरोग्यावर करीत आहे. यानंतरही शहरवासीयांना योग्य सुविधाच मिळत नाहीत. तुर्भे नाक्यावर राहणारे रिक्षाचालक नागेंद्र सोनकांबळे हे रात्री ९ वाजता गॅस भरण्यासाठी वाशीकडे जात होते. तुर्भे उड्डाणपुलावर रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामुळे ते रिक्षातून खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी दुसऱ्या रिक्षातून जाणाऱ्या तुर्भे नाक्यावरील महिलेने तत्काळ त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात नेले. त्यांनतर नातेवाइकांनी हिरानंदानीमध्ये महापालिकेच्या कोट्यातून भरती करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी त्यास होकार दिला, परंतु प्रत्यक्षात संबंधित व्यवस्थापनाला काहीच माहिती दिली नाही. रुग्णास हिरानंदानी रुग्णालयात नेले. परंतु त्यांना निघून जाण्यास सांगण्यात आले. नातेवाईक त्यांना एमजीएममध्ये नेण्यासाठी निघाले असता पालिकेच्या डॉक्टरांनी परत बोलावून ट्रामा केअर युनिटमध्ये दाखल केले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सोनकांबळे यांना वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.