बेस्टच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By admin | Published: October 13, 2016 04:30 AM2016-10-13T04:30:59+5:302016-10-13T04:30:59+5:30
साकीनाका येथे बेस्ट बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड
मुंबई : साकीनाका येथे बेस्ट बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केल्याने, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
साकीनाका येथील मोहाली पाइपलाइन परिसरात राहणारा प्रवीण पुजारी याचा या अपघातात मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र सुमित चंदनशिवे हा या अपघातात जखमी झाला. हे दोघे सकाळी चहा पिण्यासाठी निघाले. दरम्यान, खैरानी रोडच्या एस.जे. स्टुडिओजवळ घाटकोपरवरून फिल्टरपाड्याला जाणाऱ्या रूट क्रमांक ४२१ या बसची धडक पुजारीच्या दुचाकीला बसली. त्यामुळे प्रवीण हा जवळच्या दुभाजकावर आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर चंदनशिवेदेखील जखमी झाला. हा प्रकार पाहून या परिसरात प्रचंड तणाव निर्माण होत, स्थानिकांनी दोन बसची तोडफोड केली. या दोघा जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
‘पुजारीने गाडी चालवताना हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अन्यथा त्याचा जीव वाचला असता,’ असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. या प्रकरणी तानाजी कुंभार या बसचालकाला अटक करण्यात आल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)