मुंबई : मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून, एका अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना, शनिवारी रात्री चेंबूरच्या आर. सी. मार्गावर घडली. सुफियान शेख असे या मुलाचे नाव असून, तो गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये राहात होता. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.गोवंडीच्या रफिकनगर येथे राहणारा हा अडीच वर्षांचा मुलगा, वडील मोहम्मद शेख आणि आईसह चेंबूरच्या विजयनगर येथे मामाकडे आला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिघेही पुन्हा घराकडे जाण्यासाठी निघाले. याच वेळी नवजीवन सोसायटीसमोर असलेल्या या खड्ड्याच्या जवळून तिघेही जात होते. या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने, पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात येथे एक छोटा पूल बांधला आहे. याच पुलावर तिघे जात असताना, अचानक हा मुलगा पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडला. आई-वडिलांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर, काही रहिवाशांनी पोलीस आणि अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाला खड्ड्यातून बाहेर काढले. त्यानंतर, त्याला याच परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच या मुलाचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू
By admin | Published: January 02, 2017 6:59 AM