नाकाबंदीत जखमी झालेल्या हवालदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:59 AM2018-05-20T01:59:51+5:302018-05-20T01:59:51+5:30
दुचाकी चालक सिराजद्दीन शेख (२६) याला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुंबई : नाकाबंदी कर्तव्य बजावताना दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गावदेवी पोलीस ठाण्याचे सुनील कदम यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी दुचाकी चालक सिराजद्दीन शेख (२६) याला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कदम हे सहकाऱ्यासोबत ११ मे रोजी पहाटे कॅडबरी जंक्शन येथे नाकाबंदी करत होते. त्या वेळी ट्रिपल सीट आलेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडविले. दुचाकी चालक सिराजद्दीन शेखकडे वाहन परवाना नव्हता. नंबर प्लेटमध्येही छेडखानी केली होती. त्यामुळे हवालदार कदम व आरोपी शेख याच्या दुचाकीवरून गावदेव पोलीस ठाण्यात जाण्यास निघाले. सिग्नलजवळ शेख याने यूटर्न घेऊन दुचाकी सुसाट पळविली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांवर दुचाकी धडकून फुटपाथवर चढून खांबाला धडकली. यात हवालदार कदम व आरोपी शेख गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली होती. तसेच डोक्याच्या दोन रक्तवाहिन्या तुटल्या होत्या.